स्वरसंधी
(संधी - स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी)
आपण बोलत असताना किंवा संभाषण करत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ - 'सूर्य अस्ताला गेला' असे वाक्य न बोलता, ' सूर्यास्त झाला' असे आपण सहज बोलून जातो. ' इति आदी' असे न म्हणता 'इत्यादी' असा शब्द तयार होतो. 'वाक् मय' यांच्या ऐवजी 'वाङ् मय' असा एक शब्द तयार करून आपण बोलतो. अशाप्रकारे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. अशाप्रकारे वर्ण जर एकत्र होत असतील त्याप्रकारास 'संधी' असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय.
स्वरसंधी म्हणजेच शब्दामध्ये एकमेकांजवळ येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात. (स्वर + स्वर ) उदा. कवि + ईश्वर = ( इ + ई ) कवीश्वर.
जवळ-जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण जर व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्याला 'व्यंजनसंधी' असे म्हणतात. (व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर ). उदा. - सत् + जन = ( त् + ज् ) = सज्जन, चित् + आनंद = ( त् + आ ) = चित्तानंद.
एकत्रीत येत असलेल्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो अशा वेळी तयार होणाऱ्या संधीला 'विसर्गसंधी' असे म्हणतात. ( विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर ) उदा. -तपः + धन = तपोधन, दुः + आत्मा = दुरात्मा.
यातील तीन संधीपैकी सर्वप्रथम आपण 'स्वरसंधी' बाबतचे मुख्य नियम पाहू या.
स्वरसंधी :
१) पुढे दिलेले शब्द व त्यांचे संधी यांचे निरीक्षण करा.
पोटशब्द : सूर्य + अस्त
जवळ येणारे स्वर व संधी : अ + अ = आ
जोडशब्द : सूर्यास्त
पोटशब्द : देव + आलय
जवळ येणारे स्वर व संधी : अ + आ = आ
जोडशब्द : देवालय
पोटशब्द : विद्या + अर्थी
जवळ येणारे स्वर व संधी : आ + अ = आ
जोडशब्द : विद्यार्थी
पोटशब्द : महिला + आश्रम
जवळ येणारे स्वर व संधी : आ + आ = आ
जोडशब्द : महिलाश्रम
पोटशब्द : मुनि + इच्छा
जवळ येणारे स्वर व संधी : इ + ई = ई
जोडशब्द : मुनीच्छा
पोटशब्द : गिरि + ईश
जवळ येणारे स्वर व संधी : इ + ई = ई
जोडशब्द : गिरिश
पोटशब्द : महा + ईश
जवळ येणारे स्वर व संधी : ई + ई = ई
जोडशब्द : महीश
पोटशब्द : गुरु + उपदेश
जवळ येणारे स्वर व संधी : उ + उ = ऊ
जोडशब्द : गुरूपदेश
पोटशब्द : भू + उद्धार
जवळ येणारे स्वर व संधी : ऊ + उ = ऊ
जोडशब्द : भूध्दार
यावरून तयार होणारा नियम असा होतो :
ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वराच्या पुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. (दीर्घत्वसंधी असे म्हणतात.)
२) पुढील शब्दांचे संधी पहा :
पोटशब्द : ईश्वर + इच्छा
जवळ येणारे स्वर व संधी : अ + इ = ए
जोडशब्द : ईश्वरेच्छा
पोटशब्द : गण + ईश
जवळ येणारे स्वर व संधी : अ + ईं = ए
जोडशब्द : गणेश
पोटशब्द : उमा + ईश
जवळ येणारे स्वर व संधी : आ + ई = ए
जोडशब्द : उमेश
पोटशब्द : चंद्र + उदय
जवळ येणारे स्वर व संधी : अ + उ = ओ
जोडशब्द : चंद्रोदय
पोटशब्द : महा + उत्सव
जवळ येणारे स्वर व संधी : आ + उ = ओ
जोडशब्द : महोत्सव
पोटशब्द : देव + ऋषि
जवळ येणारे स्वर व संधी : अ + ऋ = अर्
जोडशब्द : देवर्षि
पोटशब्द : महा + ऋषि
जवळ येणारे स्वर व संधी : आ + ऋ = अर्
जोडशब्द : महर्षि
यावरून पुढील नियम तयार होतो :
अ किंवा आ यां स्वरांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो. उ किंवा ऊ आल्यास 'ओ' येतो व ऋ आल्यास 'अर्' येतो.
टीप - यालाच संस्कृत भाषेत 'गण' असे म्हणतात. त्याचबरोबर एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच 'आदेश' असे म्हणतात. अ किंवा आ या स्वरांपुढे इ, उ, ऋ ( ऱ्हस्व किंवा दीर्घ ) आल्यास या वर्णां बद्दल अनुक्रमे ए, ओ, अर् असे वर्ण येणे याला 'गुणादेश' असे म्हणतात.
३) पुढील शब्दांचे संधी पहा.
पोटशब्द : एक + एक
जवळ येणारे स्वर व संधी : अ + ए = ऐ
जोडशब्द : एकैक
पोटशब्द : मत + ऐक्य
जवळ येणारे स्वर व संधी : अ + ऐ = ऐ
जोडशब्द : मतैक्य
पोटशब्द : सदा + एव
जवळ येणारे स्वर व संधी : आ + ए = ऐ
जोडशब्द : सदैव
पोटशब्द : प्रजा + ऐक्य
जवळ येणारे स्वर व संधी : आ + ऐ = ऐ
जोडशब्द : प्रजैक्य
पोटशब्द : जल + ओघ
जवळ येणारे स्वर व संधी : अ + ओ = औ
जोडशब्द : जलौघ
पोटशब्द : गंगा + ओघ
जवळ येणारे स्वर व संधी : आ + ओ = औ
जोडशब्द : गंगोघ
पोटशब्द : वृक्ष + औदार्य
जवळ येणारे स्वर व संधी : अ + औ = औ
जोडशब्द : वृक्षौदार्य
यावरून निघणारा नियम असा :
अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ येतो आणि ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल औ येतो. यालाच 'वृद्ध्यादेश' (वृद्धि + आदेश ) असे म्हणतात.
४) पुढील शब्दांचे संधी पहा.
पोटशब्द : प्रीति + अर्थ
जवळ येणारे स्वर व संधी : इ + अ = य् + अ = य
जोडशब्द : प्रीत्यर्थ
पोटशब्द : इति + आदी
जवळ येणारे स्वर व संधी : इ + आ = य् + आ = या
जोडशब्द : इत्यादी
पोटशब्द : अति + उत्तम
जवळ येणारे स्वर व संधी : इ + उ = य् + उ = यु
जोडशब्द : अत्युत्तम
पोटशब्द : प्रति + एक
जवळ येणारे स्वर व संधी : इ + ए = य् + ए = ये
जोडशब्द : प्रत्येक
पोटशब्द : मनु + अंतर
जवळ येणारे स्वर व संधी : उ + अ = व् + अ = व
जोडशब्द : मन्वंतर
पोटशब्द : सु + अल्प
जवळ येणारे स्वर व संधी : उ + अ = व् + अ = व
जोडशब्द : स्वल्प
पोटशब्द : पितृ + आज्ञा
जवळ येणारे स्वर व संधी : ऋ + आ = र् + आ = रा
जोडशब्द : पित्राज्ञा
याबाबतचा नियम पुढीलप्रमाणे :
इ, उ, ऋ ( ऱ्हस्व किंवा दीर्घ ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ - ई बद्दल य्, उ - ऊ बद्दल व् आणि ऋ बद्दल र् हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिळून संधी होता.
टीप : इ, उ, ऋ यांबद्दल अनुक्रमे य्, व्, र् असे आदेश होतात. त्यांनाच 'यणादेश' असेही म्हणतात - (यण् + आदेश ). य्, व्, र् यांच्या बद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास 'संप्रसारण' म्हणतात. उदा. येथे - इथे, नव - नऊ, कृष्ण - क्रिष्ण, गायी - गाई, सोयी - सोई.
५) पुढील शब्दांचे संधी पाहा.
पोटशब्द : ने + अन
जवळ येणारे स्वर व संधी : ए + अ = अय् + अ = अय
जोडशब्द : नयन
पोटशब्द : गै + अन
जवळ येणारे स्वर व संधी : ऐ + अ = आय् + अ = आय
जोडशब्द : गायन
पोटशब्द : गो + ईश्वर
जवळ येणारे स्वर व संधी : ओ + ई = अव् + ई = अवी
जोडशब्द : गवीश्वर
पोटशब्द : नौ + इक
जवळ येणारे स्वर व संधी : औ + इ = आव् + इ = आवि
जोडशब्द : नाविक
याबाबतचा नियम असा :
ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
इ, उ, ऋ ( ऱ्हस्व किंवा दीर्घ ) यांना होणारे विविध आदेश थोडक्यात पुढे दिले आहेत.
स्वर : अ आ
दीर्घादेश : --------
गुणदेश : --------
वृद् ध्यादेश : आ
यणादेश : --------
स्वर : इ, ई
दीर्घादेश : ई
गुणदेश : ए
वृद् ध्यादेश : ऐ
यणादेश : य्
स्वर : उ, ऊ
दीर्घादेश : ऊ
गुणदेश : ओ
वृद् ध्यादेश : औ
यणादेश : व्
स्वर : ऋ
दीर्घादेश : --------
गुणदेश : अर
वृद् ध्यादेश : आर्
यणादेश : र्
सरावासाठी काही प्रश्न :
१) संधी कशास म्हणतात? संधी किती प्रकारचे आहेत ते उदाहरणे देऊन सांगा.
२) पुढील शब्दांचे संधी करा व ते ज्या नियमांनी होतात ते नियम सांगा.
राष्ट् + इतिहास महा + उत्सव अन्य + उक्ती
महा + ईश मद + अंध प्रति + अक्ष
नदी + उद्गम. कृपा + ओघ. गुरू + आज्ञा
३) पुढील शब्दांतील संधी सोडवून पोटशब्द लिहा, व त्याबाबतचा नियम सांगा.
अल्पोपाहार धारोष्ण ईश्वरेच्छा
पुरुषोत्तम सहाध्यायी परीक्षा
चिंतातुर राष्ट्रोत्तेजक. लंकेश्वर
पुढील भागामध्ये : व्यंजनसंधी व त्यावरील नियम...
संग्रहक
श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
सहशिक्षक
एम्, ए, डी, एड्.