वर्ण विचार - प्रकार, उच्चार स्थाने व जोडाक्षरे
वर्णांचे विविध प्रकार
'भाषा' कशास म्हणतात हे आपण पाहिले. बोलताना किंवा लिहिताना आपण एकामागून एक असे विचार मांडत असतो. आपल्याकडून किंवा आपल्या मुखातून व्यक्त झालेला सर्व विचार पुर्ण अर्थाचा असेल तर त्यास 'वाक्य' असे म्हणतात. 'मुलांनी खरे बोलावे' हे एक वाक्य आहे. वाक्य तयार करताना त्यामध्ये आपण एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपण एक विचार पूर्ण व्यक्त करत असतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वरील वाक्यात १) मुलांनी, २) खरे, ३) बोलावे. तीन शब्द आहेत. वाक्य हे अनेक शब्दांपासून किंवा अनेक पदांपासून तयार झालेले असते.
आपण पाहिल तर १) मु, २) लां, ३) नी, अशी तीन अक्षरे मुलांनी या शब्दात आहेत. यामध्ये एका क्रमबद्ध क्रमाने असलेल्या या तीन अक्षरांच्या समूहाला काही अर्थ आहे. हा अक्षरांचा क्रम बदलून 'लांनीमु' असा एक अक्षर समूह बनवला तर त्याला काही अर्थ उरणार नाही. म्हणून तो शब्द नव्हे. एका क्रमबद्ध पद्धतीने आलेल्या अनेक अक्षरांना ठराविक अर्थ प्राप्त होत असेल तरच त्याला 'शब्द' असे म्हणतात. 'शब्द' हे अक्षरांचे बनलेले असतात.
'मुलांनी' हा शब्द उच्चारताना १) मु, २) लां, ३) नी, हे तीन ध्वनी आपल्या तोंडावाटे बाहेर पडतात. हे तीन ध्वनी 'मु, लां, नी' अशा तीन गुणांनी आपण कागदावर लिहून दाखवतो. यांना आपण 'अक्षरे' असे म्हणतो. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या कोण आहेत, म्हणून अक्षरांना आपण 'ध्वनीचिन्हे' असे म्हणतो.
'मुलांनी' या शब्दात 'मु' हे एक अक्षर असून ते एक ध्वनीचिन्ह आहे. आपणास याठिकाणी 'मु' हा एक प्रकारचा ध्वनी वाटत असला तरी तो मूळध्वनी नव्हे. त्यात 'म्' व 'उ' असे दोन ध्वनी एकत्र आलेले आढळतील. 'मु' या अक्षरात 'म्' व 'उ' हे दोन मूळ ध्वनी आहेत. आपल्या मुखातून किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात. आपण उच्चार केल्यानतर बाहेर पडणारे हे ध्वनी आजूबाजूच्या हवेत नाहीसे होतात. ते नाहिसे होऊ नयेत किंवा कायमचे निघून जावू नयेत म्हणून ते रंगाने म्हणजेच वर्णाने आपण लिहून ठेवतो, म्हणून यांना वर्ण असे म्हणतात. लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात. म्हणून या ध्वनींना 'अ-क्षर' म्हणजेच ( कधीही नाश न होणारे ) असेही म्हणतात.
आपल्या मराठी भाषेत एकुण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत. या अठ्ठेचाळीस वर्णांच्या म्हणजेच स्वर आणि व्यंजने यांनी मिळून तयार झालेल्या मालिकेला 'वर्णमाला' किंवा 'मुळाक्षरे' असे म्हणतात. मराठीतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे :
स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः हि अक्षरे स्वर मानले जातात.
व्यंजन क्, ख्, ग्, घ्, ङ्, च्, छ्, ञ्, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, त्, थ्, द्, ध्, न्, प्, फ, ब्, भ्, म्, य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ्. हि अक्षरे व्यंजने मानली जातात.
वर्णाचे प्रकार :
स्वर - वर्णमालेतील किंवा मुळाक्षरांमधील अ, आ, पासून ते .......ओ, औ पर्यंतच्या बारा वर्णांना किंवा अक्षरांना 'स्वर' असे म्हणतात. आपल्या मुखावाटे मुळाक्षरामधीळ सर्व स्वरांचा उच्चार होत असताना आपल्या ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण आपल्या वरील आणि खालील ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना 'स्वर' असे म्हणतात. तोंडावाटे किंवा मुखावटे स्वरांचा उच्चार आपल्या सहज व स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही अक्षराची मदत न घेता करता येतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडले व पसरलेले ( = विवृत) असते. म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.
स्वरादी : वरील वर्णमालेतील पुढील दोन अक्षरे म्हणजेच 'अं' व 'अ:' या दोन वर्णांना 'स्वरादी' असे म्हणतात. या स्वरादीमध्ये पुढील दोन उच्चार आहेत अनुस्वार (ं) व विसर्ग (:). 'अनुस्वार' याचा अर्थ ( अनु+स्वार ) पाठीमागून झालेला उच्चार किंवा एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार. जेव्हा आपल्या मुखावाटे अनुस्वाराचा उच्चार करताना तो स्पष्ट व खणखणीत होत असेल तेव्हा तो अनुस्वार, जेव्हा तो ओझरता होतो तेव्हा तो अनुनाशिक. जसे - गंगा, घंटा, यांत अनुस्वार आहेत. 'जेव्हां, यंव, घरांत' यात अनुनाशिक आहे. अनुस्वार हो लिहून दाखवताना त्यामागे असलेल्या वर्णाच्या डोक्यावर एक टिंब किंवा बिंदू ठेवून दाखवला जातो. जसे - अं, शं, मं.
'विसर्ग' याचा अर्थ 'श्वास सोडणे.' याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंबे एकाखाली एक (:) या पध्दतीने लिहितात. या चिन्हाच उच्चार करताना 'हृ' या वर्णाला थोडा हिसका किंवा झटका देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना कोणत्याही एका स्वराचा उच्चार प्रथम करावा लागतो. अं व अ: या अक्षरांचा उच्चार करताना आपल्याला 'अ' या स्वराचे सर्वात प्रथम साहाय्य घ्यावे लागते. अंगण, आंघोळ, इंद्र, उंट, एंजिन, ओंजळ, औंध या शब्दांतील अनुस्वारांच्यापूर्वी कोणता ना कोणता तरी स्वर आलेला आढळतो. तीच गोष्ट विसर्गाच्या बाबतीत पाहावयास मिळते. स्वतः, नि:स्पृह, दु:ख, छे: या शब्दांतील विसर्गाच्या पूर्वी विविध स्वर आलेले दिसतील. वर्णमालेतील / मुळाक्षरामधील विविध अक्षरांसोबत किंवा वर्णांसोबत अनुस्वार व विसर्ग यांचा आपण उच्चार करताना या वर्णांच्या आधी स्वर जोडत असतो. म्हणून यांना 'स्वरादी' असे म्हणतात. 'स्वरादी' म्हणजे 'स्वर' आहे. आदी म्हणजे आरंभी ज्याच्या असा वर्ण.
व्यंजन - मराठी मुळाक्षरामधील किंवा वर्णमालेतील क्, ख्, ग्...... या अक्षरापासून ह्, ळ् या अक्षरापर्यंतचे वर्ण असे आहेत की त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. या वर्णांचा तोंडावाटे पूर्ण उच्चार करण्यासाठी शेवटी आपल्याला 'अ' या स्वराची मदत घ्यावी लागते. अशा वर्णांना 'व्यंजने' असे म्हणतात. (वि + अञ्ज् = प्रकट किंवा व्यक्त करणे. ) वर्णमालेतील किंवा मुळाक्षरामधील व्यंजने पूर्ण उच्चार नसलेली म्हणजेच ती अपूर्ण उच्चाराची ( = लंगडी ) आहेत हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. जसे - क्, ट्, प्, र्, ह्, पण व्यवहारात त्यांचा उच्चार 'अ' हा स्वर मिसळूनच करतात. जसे - क, ट, प, र, ह. म्हणून व्यंजनांना 'स्वरान्त' किंवा 'परवर्ण' असेही म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करताना तोंड बंद किंवा संकुचित ( = संवृत ) असते, म्हणजे हवेचा मार्ग जीभ किंवा ओठ याने अडविलेला असतो.
अक्षरे - एकुण स्वर आणि व्यंजने यांचा पूर्ण उच्चार केला जातो किंवा ज्या वर्णांचा उच्चार पुर्णपणे केला जातो त्यांना अक्षरे म्हणतात. या वर्णामधील अ, आ, इ, ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारायचे आहेत. क्, ख्, ग्, घ्...... ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यांत अ मिसळून होणारी क, ख, ग, घ..... हि अक्षरे होत. वर्णमालेतील किंवा मुळाक्षरामधील सर्व स्वर व सर्व स्वरयुक्त व्यंजने यांना 'अक्षरे' म्हणतात.
बाराखडी - व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजन तयार होताना त्यामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे दहा स्वर व अं, अ: हे दोन स्वरादी यांनी चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो. त्यांना 'बाराखडी' किंवा 'बाराक्षरी' म्हणतात. आता आपण 'क' या अक्षराची बाराखडी कशी तयार होते ते पाहू :
वर्ण - अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ: हे मुळाक्षरांमधील वर्ण आहेत.
चिन्हे - ा f ी ु ू े ै ो ौ ं ः
बाराखडी - क, का, कि, की, कु, कू के, कै, को, कौ, कं, क:
स्वरांचे प्रकार -
स्वरांचा उच्चार करताना असे आढळून येते की, त्यांतील अ, इ, उ, ऋ, लृ यांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे यांचा उच्चार करायला थोडा वेळ उच्चार करायला थोडा वेळ लागतो. म्हणून यांना 'ऱ्हस्व स्वर' असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या वर्णांच किंवा स्वरांचा मुखावटे उच्चार करताना आपल्याला अधिक वेळ लागतो. म्हणजेच त्यांचा उच्चार लांबट होतो. म्हणून यांना 'दिर्घ स्वर' असे म्हणतात. यांतील ए, ऐ, ओ, औ हे दोन - दोन स्वर एकत्र येऊन बनलेले आढळतील. जसे -
ए = अ + इ किंवा ई
ऐ = आ + इ किंवा ई
ओ = अ + उ किंवा ऊ
औ = आ + उ किंवा ऊ
वरील स्वर एकमेकांत मिसळून हे स्वर तयार झाले असल्यामुळे यांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.
ऱ्हस्व व दीर्घ हे स्वरांचे प्रकार त्यांचा उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधीवरून ठरवितात. त्यांनाच 'मात्रा' असे म्हणतात. ऱ्हस्व स्वराचा उच्चार करायला जेवढा वेळ लागतो त्याची एक मात्रा पकडली जाते. वर्णमालेत दीर्थ व संयुक्त स्वर यांच्या प्रत्येकी दोन मात्रा मानतात.
टीप - काही लोक मराठीच्या स्वरमालेतील इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, हे वर्ण काही वेगळ्या पध्दतीने सुध्दा लिहितात. मात्र ते चुकीचे आहे. स्वरमाला म्हणजे 'अ' ची बाराखडी नव्हे. मुद्रणकलेच्या व टंकलेखनाच्या सोयाच्या दृष्टीने विविध प्रकारची चिन्हे तयार करून वापरली जातात.
आपण काही वर्णांचे उच्चार करत असताना त्या वर्णाच्या एकाच उच्चारातून निघणाऱ्या इतर स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. - अ, आ, इ -, ई, उ-, ऊ, हे वर्णमालेतील परस्पर सजातीय स्वर आहेत. एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतात किंवा विविध भिन्न उच्चारातून जे स्वर बाहेर पडतात अशा स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. - अ, इ, अ- उ, इ-ए, उ-ए, अ-ऋ हे स्वर परस्पर भिन्न जातींचे आहेत म्हणून ते विजातीय आहेत.
व्यंजनांचे प्रकार -
वर्णमालेतील क्, ख्, पासून भ्, म् पर्यंतच्या व्यंजन उच्चारात आपल्या फुफ्फुसांतील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जिभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून यांना 'स्पर्श' व्यंजने असे म्हणतात.
यांमधील ङ्, ञ्, ण्, न्, म् या वर्णाचा उच्चार करताना त्या-त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबरच नशिकेतून म्हणजे नाकातूनही होतो. म्हणून त्यांना 'अनुनासिक' वर्ण असे म्हणतात. अनुनाशिकाचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होत असेल, तर त्या अनुनाशिकाच्या मागील अक्षरावर अनुस्वार देऊन तो दर्शवला जातो. केव्हा केव्हा तो पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनाशिकाने म्हणजे पंचमवर्णाने दाखवतात. जसे - गंगा (गङ् गा), घंटा ( घण्टा), वसंत (वसन्त), कंप (कम्प), ङ्, ञ्, ण्, न्, म् या अनुनासिकांना 'पर-सवर्ण' असेही म्हणतात.
य्, व्, र्, ल्, यां वर्णाची उच्चारस्थाने ही अनुक्रमे इ, उ, ऋ, लृ, या स्वरांच्या उच्चारस्थाना सारखीच आहेत. या स्वरांमध्ये संधी होत असताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी स्वर क्रमाने येतात. उदा. इति + आदी = इत्यादी, सु + अल्प = स्वल्प, पितृ + अर्थ = पित्रर्थ, लृ + आकृती = लाकृती, गायीला - गाईला, नव - नऊ, रीण - ऋण, येथे - इथे. या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. त्यांना इंग्रजीत semi - vowels (अर्धस्वर) असे म्हणतात. ही सर्व व्यंजने स्पर्श व्यंजने किंवा ऊष्मे यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना 'अंतस्थ' (दोघांच्यामध्ये असलेले) असे म्हणतात.
श्, ष्, स् यांना ऊष्मे असे म्हणतात. ऊष्मन् = वायू. जेव्हा आपण जोराने उसासा म्हणजेच वायू शरीराबाहेर टाकतो त्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो. यात घर्षण आहे. एकमेकांना घासून जाप्रमाणे घर्षण होते त्याप्रमाणे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून यांना 'उष्मे' असे म्हणतात. या वर्णाचे उच्चार करताना ते प्रखर, जोरदार व उष्णता उत्पन्न करणारे असतात.
'ह्' या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फ्सातील हवा तोंडावाटे बाहेर, जोराने फेकली जाते. म्हणून याला 'महाप्राण' असे म्हणतात. ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष्, स् या वर्णात 'ह्' या उच्चाराचे छटा असल्यामुळे या व्यंजनासही 'महाप्राण' असे म्हणतात. इतर वीस व्यंजनांना 'अल्पप्राण' म्हणतात. 'ळ्' हा स्वतंत्र वर्ण मानला जातो.
मराठी वर्णमाला व वर्णाचे प्रकार -
स्वर - एकुण बारा आहेत. ऱ्हस्व - दीर्घ - संयुक्त : अ आ ए इ ई ऐ उ ऊ ओ ऋ औ लृ
स्वरादी - एकुण दोन आहेत. (ं) (:) : अं अ:
व्यंजने किंवा स्वरान्त - एकुण ३४ आहेत.
स्पर्श - कठोर, मृदू, अनुनासिक
अर्धस्वर - अंतस्थ
ऊष्मे - घर्षक
महाप्राण
स्वतंत्र व्यंजन
'क्ष' व 'ज्ञ' हे दोन मूळ स्वर किंवा ध्वनी नसून ही संयुक्त व्यंजने आहेत. दिसायला जरी ती साध्या व्यंजना सारखी दिसत असली तरी त्यांचा समावेश या वर्णमालेत करत नाहीत. कारण क्ष = क् + ष्, ज्ञ = द् + न् + य्. 'ज्ञ' चा उच्चार मराठीत 'द्न्य' असा किंचित नाकातून करतात. संस्कृतात ज्ञ = ज् + ञ्. हिंदी भाषेत त्याचा उच्चार 'ग्य' असा करतात.
पुढील भागात - वर्णांची उच्चारस्थाने...
संग्रहक
श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
सहशिक्षक
एम्, ए, डी, एड्.