वर्ण विचार - प्रकार, उच्चारस्थाने व जोडाक्षरे
जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार
पूर्ण उच्चारांच्या वर्णांनाच स्वर असे म्हटले जाते. तर व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात. कोणतेही दोन स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला 'संयुक्त स्वर' असे म्हणते जाते. उदाहरणार्थ - अ + इ = ए, अ + उ = ओ, तसेच ज्या वेळेस दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यापासून एक स्वतंत्र 'संयुक्त व्यंजन' तयार होते. उदाहरणार्थ - म् + ह् = म्ह, च् + य् = च्य, ब् + द् = ब्द. ज्यावेळेस एकच व्यंजन दोनदा जोडले जाते तेव्हा त्यास 'द्वित्त' असे म्हटले जाते. उदाहरणार्थ - क्क, च्च, त्त, प्प. अशातऱ्हने जोड व्यंजन किंवा संयुक्त व्यंजन यांची शेवटी आपण जेव्हा एक सूर मिसळवतो तेव्हा त्यापासून जोडाक्षर तयार होते. उदाहरणार्थ - ब् + द् + अ = ब्द, म् + ह् + ई = म्ही.
म्हणजेच ज्यावेळेस अक्षरामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने प्रथम एकत्र आणि शेवटी त्यामध्ये एक स्वर मिसळ्तो त्यास 'जोडाक्षर' म्हणतात.
साधारणता दोन पध्दतीमध्ये जोडाक्षरे लिहिली जातात : पहिली पध्दत - एकापुढे एक वर्णन लिहून व दुसरी पध्दत - एकाखाली एक लिहून. जोडाक्षरांचे लेखन करत असताना आपण ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार करत असतो त्याच क्रमाने आपल्याला वर्णांचे लेखन करावे लागते. जोडाक्षर मध्ये प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहायची असतात. अशाप्रकारच्या अर्ध व्यंजनांचे लेखन करताना यामध्य अक्षरात उभी रेघ असते. (त, ग, व, ण, श) ती उभी रेषा काढावी. उदाहरणार्थ - त् + व = त्व, श् + य = श्य, स् + त् + य् + आ = स्त्या.
ज्या अक्षरांमध्ये काना किंवा उभी रेघ नसते त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करत असताना, त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनांचा पाय मोडून लिहावा लागतो व पुढील अक्षर त्यास जोडावे लागते. उदाहरणार्थ - ङ् + या = ड्या, द् + या = द्या किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात. उदाहरणार्थ - ड्या, घ्या.
'र' या व्यंजनाची जोडाक्षरे आपण चार पद्धतीने लिहू शकतो.
१) उभी रेषयक्त असलेल्या व्यंजनामध्ये र् जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदाहरणार्थ - भ्रम, ग्रहण, वज्र, आम्र, प्रकार, तीव्र, सहस्त्र, इत्यादी.
२) ज्या व्यंजनामध्ये उभी रेषा नसते त्यामध्ये र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षरा खाली काकपदासारखे चिन्ह जोडले जाते. उदाहरणार्थ - ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉईंग, ड्रिल.
३) र् या व्यंजनाला जावेळी आपण दुसरे अक्षर जोडत असतो अशावेळी मागच्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ देतात. उदाहरणार्थ - गर्व, मूर्ख, दर्प.
४) र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडत असताना मागच्या अक्षरावर आघात येत नसेल तर ( सामान्यतः यामध्ये ह किंवा य जोडायचा असल्यास ) र् ऐवजी पुढील प्रमाणे चिन्हांचा वापर करतात. उदाहरणार्थ - बिऱ्हाड, चऱ्हाट, भाकऱ्या, दुसऱ्या, साताऱ्याची.
'ह्' युक्त सर्व जोडाक्षरे संस्कृतमध्ये : - 'ह्' हा नेहमी प्रथम येतो. उदाहरणार्थ - ब्रह्मा, ब्राह्मण. पण मराठी या 'ह्' चा उच्चार प्रारंभी न करता वर्णांची अदलाबदल म्हणजेच म्हणजेच वर्ण विपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व प्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ - ब्रम्हा, ब्राम्हणवाद, चिन्हाकीत, ऱ्हस्व, जिव्हा, प्रल्हाद.
काही जोडाक्षरे लिहित असताना ती वेगळ्या पद्धतीने लिहितात ती पुढील प्रमाणे: क्त, ऋ, द्य, श्र, क्ष, ज्ञ, त्त, ध्द, श्व, द्व इत्यादी.
मराठी भाषेतील स्वरांची उच्चारपद्धती :
मराठीमधील मूलध्वनी म्हणजेच वर्ण व त्यांची उच्चारस्थाने ही आपण या संपूर्ण भागांमध्ये समजावून घेतली. मराठी भाषेमध्ये विविध वर्णांचा विचार केल्यास आपणास सामान्यत: एका वर्णाचे एकच चिन्ह व एकच विचार दिसून येतो, परंतु याला काही वर्ण अपवाद आहेत. मराठी भाषेमध्ये प्रत्येक वर्णांचा पूर्णोच्चार होतो. त्याशिवाय त्यांचे लांबट व तोकडा (निभृत्) असेही उच्चार होतात. उदाहरणार्थ - 'गवत' हा शब्द घ्या. यात तीन 'अ'कार आहेत. पण तीन 'अ' चे उच्चार भिन्न आहेत. मात्र त्यांची लेखन पद्धती सारखीच आहे. 'ग' मधील 'अ' हा पूर्ण उच्चाराचा वर्ण आहे. त्याला 'ऱ्हस्व उच्चार' असेही म्हणतात. 'व' मधील 'अ' हा लांबट उच्चाराचा वर्ण आहे. तो दीर्घ उच्चार नाही. 'त' वर्णामधील 'अ' या स्वराचा उच्चार तोकडा किंवा निसरडा असतो. याला अपूर्णोच्चारित (निभृत्) असे म्हणतात. 'गवत' हा शब्द प्रत्यक्ष उच्चारूनच पाहा म्हणजे 'अ' चे तीनही उच्चार सहज समजतील. 'सहल' मधील - स (ऱ्हस्व), ह (लांबट), ल् (तोकडा).
'अ' चे उच्चार :
१) मराठी शब्दातील अन्त्य 'अ' हा निभृत् म्हणजेच अर्धवट, कोता, अपूर्ण उच्चारला जातो. जसे - कपाट (ट्), पान (न्), जवळ (ळ्), पाऊस (स्).
२) अकारान्ताऐवजी इतर कोणत्याही शब्दांतील उपान्त्य अक्षर 'अ' युक्त असेल तर त्याचा उच्चार करताना अपूर्ण उच्चारले जाते. जसे - नकटा (नक् टा ) पोचले (पोच् ले).
३) विविध चार अक्षरी शब्दांचा उच्चार करताना त्या शब्दातील दुसऱ्या अक्षरातीला अ हा अपूर्ण उच्चारला जातो. जसे - करवत (कर्वत), सरकार (सर्कार).
४) ग, ढ, व या एक अक्षरी शब्दातील 'अ' या स्वराचा उच्चार करताना त्याचा करताना साधारणता उच्चार लांबट होतो जसे - राम व सीता, त्याला 'ग' ची बाधा झाली आहे, हा मुलगा ढ आहे.
इतर स्वरांचे उच्चार :
१) प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व (जलद) व लांबट असे दोन उच्चार होतात. उदाहरणार्थ -
स्वर - अ
लांबट उच्चार - अट
ऱ्हस्व उच्चार - अडका
स्वर - आ
लांबट उच्चार - आड
ऱ्हस्व उच्चार - आमचा
स्वर - इ
लांबट उच्चार - ईश
ऱ्हस्व उच्चार - इहलोक
स्वर - उ
लांबट उच्चार - ऊस
ऱ्हस्व उच्चार - उसाचा
स्वर - ए
लांबट उच्चार - एक
ऱ्हस्व उच्चार - एकटा
स्वर - ऐ
लांबट उच्चार - ऐक
ऱ्हस्व उच्चार - ऐकून
स्वर - ओ
लांबट उच्चार - ओठ
ऱ्हस्व उच्चार - ओठांत
स्वर - औ
लांबट उच्चार - औत
ऱ्हस्व उच्चार - औषध
२) अकारान्तापूर्वीचे स्वर मराठीत लांबट उच्चारले जातात. उदा. मन, गात, विष, गुण, मेघ, म्हैस, मोर, कौल.
३) दीर्घान्तापूर्वीचे स्वर ऱ्हस्व उच्चारले जातात. उदा. मुळा, मासा, विटी, कुहू, पैसा, घोडा, नौका.
४) संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये कोणताही बदल न करता जसेच्या तसे आलेल्या तत्सम शब्दांतील अंत्य 'अ' उच्चार करताना तो पूर्णोच्चारित असतो. उदा. गुण, विष, मंदिर, सुर, गृह, निर्झर, नृप.
मराठीत गुण, विष, मंदिर यासारख्या शब्दांतील उपान्त्य 'इ' व 'उ' थोडे लांबट उच्चारले जात असले तरी त्यांचा उच्चार दीर्घ नसतो. म्हणून ते वीष, गूण, मंदीर असे लिहू नयेत, विष, गुण, मंदिर असेच लिहावेत.
५) जोडाक्षर, अनुस्वार व विसर्ग यानंतरचा 'अ' हा स्वर साधारणता तोकडा किंवा निभृत नसतो. उदा. भिंत, शिस्त, गुच्छ, दु:ख, नि:संशय इत्यादी शब्द.
अनुस्वरांचे उच्चार:
अनुस्वराचे किंवा बिंदूंचे उच्चार दोन प्रकारे आहे. १) खणखणीत व २) ओझरता. खणखणीत उच्चारात अनुस्वार असे म्हणतात. तर ओझरत्या उच्चारास 'अनुनासिक' असे म्हणतात.
१) मराठी भाषेमध्ये अनुस्वरांचा उच्चार खणखणीत होतो. उदाहरणार्थ - घंटा, आंबा, चिंच
२) अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारख (ङ्, ञ्, ण्, न्, म् ) म्हणजे पंचमवर्णासारखा होतो. उदा. शंकर ( शंङ्कर, चंचल (चञ्चल), घंटा (घण्टा), भिंत (भिन्त).
३) अनुस्वारापुढे 'य' व 'ल' आल्यास त्याचा उच्चार अनुनासिक य ( यँ) किंवा व ( वँ) सारखा होतो. उदा. संयम - संय्यम.
४) अनुस्वरापुढे 'र', 'व', 'श', 'ष', 'ह' ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक 'व' युक्त वँ बनते. उदा. संशय - संव्शय, संसार - संव्सार इत्यादी शब्द.
कोणत्याही विसर्ग वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या मागे असलेल्या स्वरामागोमाग ह्कार युक्त होतो. उदा. दु:ख, (दुह्ख), अंत:करण (अंतह् करण).
जोडाक्षर असलेल्या कोणत्याही वर्णाच्या आधी ऱ्हस्व स्वरावर आघात आल्यास त्याचा उच्चार करताना येणारा स्वर दीर्घ उच्चारला जातो. उदा. रक्त, रस्ता, शिष्य, मुद्दा, विठ्ठल, पण आघात येत नसल्यास तो ऱ्हस्वच उच्चारला जातो. जसे - वऱ्हाड, उद्या, तुझ्या.
मराठीत वर्णांच्या उच्चाराची पध्दत कशी आहे याची थोडक्यात माहिती आपण सलग तीन भागांमध्ये घेतली आहे. धन्यवाद!
सरावासाठी प्रश्न :
१) वर्ण म्हणजे काय? वर्ण किती प्रकारचे असतात?
२) स्वर व व्यंजन यांतील फरक स्पष्ट करा?
३) मराठी वर्णमालेतील स्वर कोणते? त्यांचे प्रकार सोदाहरण सांगा?
४) अनुस्वार व विसर्ग यांना 'स्वरादी' असे का म्हणतात?
५) बाराखडी कशास म्हणतात? ती कशी तयार होते?
६) संयुक्त व्यंजन व जोडाक्षर यामधील फरक स्पष्ट करा?
७) अनुनासिक म्हणजे काय? अनुनासिकांचा उपयोग करून प्रत्येकी एक असे पाच शब्द लिहा?
८) सजातीय व मृदू वर्ण कशाला म्हणतात व ते कोणते आहेत ते लिहा?
९) कठोर व मृदू वर्ण कशास म्हणतात व ते कोणते लिहा?
१०) पुढील शब्दातील वर्णरचना लिहा. -धृत्तराष्ट्र, चक्रपाणी, ड्रायव्हर, शिल्पकार, प्रावीण्य, भक्ष्य.
संग्रहक
श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
सहशिक्षक
एम्. ए. डी. एड्.