व्यंजनसंधी
(संधी - स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी)
१) पुढील शब्दांचे होणारे संधी पहा.
पोटशब्द : विपद् + काल
व्यंजने व संधी : द् + कृ = त् + क् = त्क
जोडशब्द : विपत्काल
पोटशब्द : वाग् + पति
व्यंजने व संधी : ग् + प् = क् + प् = क्प
जोडशब्द : वाक्यति
पोटशब्द : वाग् + ताडन
व्यंजने व संधी : ग् + त् = क् + त् = क्त
जोडशब्द : वाक्ताडन
पोटशब्द : षड् + शास्त्र
व्यंजने व संधी : ड् + श् = ट् + श् = ट्श्
जोडशब्द : षट्शास्त्र
पोटशब्द : क्षुध् + पिपासा
व्यंजने व संधी : ध् + प् = त् + प् = त्प
जोडशब्द : क्षुत्पिपासा
याबाबतचा नियम पुढीलप्रमाणे :
वरील पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय वर्णमालेतील कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, यालाच - 'प्रथम - व्यंजन संधी' म्हणतात.
२) पुढील शब्दांचे संधी पाहा :
पोटशब्द : वाक् + विहार
व्यंजने व संधी : क् + व् = ग् + व् = ग्व
जोडशब्द : वाग्विहार
पोटशब्द : षट् + रिपू
व्यंजने व संधी : ट् + र् = ड् + र् = ड्र
जोडशब्द : षडिपू
पोटशब्द : सत् + आचार
व्यंजने व संधी : त् + आ = द् + आ = दा
जोडशब्द : सदाचार
पोटशब्द : अच् + आदी
व्यंजने व संधी : च् + आ = ज् + आ = जा
जोडशब्द : अजादी
पोटशब्द : अप् + ज
व्यंजने व संधी : प् + ज् = ब् + ज् = ब्ज
जोडशब्द : अब्ज
याबाबताचा नियम असा आहे की :
वरील १ल्या पाच वर्गांतील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन येत असल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, याला 'तृतीय व्यंजन संधी' म्हणतात.
३) पुढील शब्दांचे संधी पाहा :
पोटशब्द : वाक् + निश्चय
व्यंजने व संधी : क् + न् = ङ + न्
जोडशब्द : वाङ्निश्चय
पोटशब्द : षट् + मास
व्यंजने व संधी : ट् + म् = ण् + म
जोडशब्द : षण्मास
पोटशब्द : जगत् + नाथ
व्यंजने व संधी : त् + न् = न् + न्
जोडशब्द : जगन्नाथ
पोटशब्द : सत् + मती
व्यंजने व संधी : त् + म् = न् + म्
जोडशब्द : सन्मती
याबाबतचा नियम असा :
वरीलपैकी १ल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले असल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते, याला 'अनुनासिक संधी' म्हणतात.
४) पुढील शब्दांतील संधी पाहा :
पोटशब्द : सत् + चरित्र
व्यंजने व संधी : त् + च् = च् + च्
जोडशब्द : सच्चरित्र
पोटशब्द : उत् + छेद
व्यंजने व संधी : त् + छ् = च् + छ्
जोडशब्द : उच्छेद
पोटशब्द : सत् + जन
व्यंजने व संधी : त् + ज् = ज् + ज्
जोडशब्द : सज्जन
पोटशब्द : तत् + टीका
व्यंजने व संधी : त् + ट् = ट् + ट्
जोडशब्द : तट्टीका
पोटशब्द : उत् + लंघन
व्यंजने व संधी : त् + ल् = ल् + ल्
जोडशब्द : उल्लंघन
पोटशब्द : सत् + शिष्य
व्यंजने व संधी : त् + श् = च् + छ्
जोडशब्द : सच्छिष्य
याबाबतचा नियम असा :
वर्णमालेतील 'त्' या व्यंजनापुढे - १) च्, छ्, हे वर्ण आल्यास त् बद्दल च् होतो. २) ज्, झ हे वर्णआल्यास त् बद्दल ज् होतो. ३)त्याचबरोबर ट् किंवा ठ् हे वर्ण आल्यास त् बद्दल ट् होतो. ४) ल् हा वर्ण आल्यास त् बद्दल ल् होतो. ५) तसेच 'श्' वर्ण आला असल्यास 'त्' ऐवजी 'च्' होतो व पुढील 'श्' बद्दल 'छ्' होतो. ६) 'म' या व्यंजनापुढे एखादा स्वर आ तो स्वर मागील 'म' मध्ये मिसळून जातो. त्याचबरोबर 'म' च्या पुढे व्यंजन आल्यास 'म' बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा बिंदू येतो. ६) 'छ्' या वर्णापूर्वी कोणताही ऱ्हस्व स्वर आला असेल तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो.
सरावासाठी प्रश्न :
१) पुढील शब्दांचे संधी करा व ते ज्या नियमांनी होतात ते सांगा.
दिक् + विजय
दिक् + मूढ
जगत् + ईश्वर
सत् + मती
मत् + जनक
सत् + बुध्दी
आपद् + काल
उत् + लेख
षट् + मास
२) पुढील शब्दांतील संधी सोडवून पोटशब्द लिहा व त्याबाबतचा नियमा सांगा.
उध्दार मृच्छकटिक अब्धी सच्चित्
सच्छील. भगवद्गीता वाग्रस उज्जल
दिगंबर जगदीश्वर सद्वासना मन्मन