आपली भाषा, लिपी व व्याकरण
( मराठी व्याकरण - लेखन )
भाषा म्हणजे काय?
आपल्याला काहीतरी पाहिजे असल्यास किंवा काही तरी कोणाला सांगायचे असले तर आपण काय करतो? आपल्या मनातला हा विचार आपल्या शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्याला तहान लागली की, "मला पाणी पाहिजे" असे आपण बोलून सांगतो किंवा हातची ओंजळ ओठांजवळ नेऊन आपण खुणेने तसे सांगतो. मनुष्य आपले विचार बोलून किंवा खुणा करून दाखवतो. पशुपक्षी काय करतात? चिमणी चिव चिव करते, कावळा काव काव करतो, कुत्रा भुंकतो, गाय हंबरते, घोडा खिंकाळतो व सिंह गर्जना करतो. पशुपक्षी हेही वेगवेगळे आवाज काढून आपले मनोगत व्यक्त करतात. तर मास्तर 'कडकट् कडकट्' असा ध्वनी निर्माण करून बातमी कळवितो व बालवीर निशाणे वर खाली करून दूर अंतरावर आपला संदेश पोचवितो. आपल्या मनातील वेगवेगळे भाव, मत, विचार किंवा भावना व्यक्त करण्याचे हे विविध प्रकार आहेत. एका अर्थाने या सार्या भाषाच आहे. कोणतीही भाषाही म्हणजे आपआपले भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन होय.
भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे : १) स्वाभाविक आणि नेसर्गिक व २) कृत्रिम किंवा सांकेतिक. आवाज, चेहरा व इतर हावभाव वगैरेंनी व्यक्त होणारी भाषाही स्वाभाविक किंवा नैसर्गिक असून ती सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ - आश्चर्य वाटल्यास आपण भुवया उंच करतो. नापसंती दाखवायचे असल्यास आपण भुवया अंकुचित करतो, एखादी गोष्ट नाकारायची असल्यास मान आडवी हलवितो किंवा रागवायचे असल्यास डोळे वटारतो. पृथ्वीतलावरील माणसाची व्यक्त होण्याची, बोलण्याची किंवा हावभावांची भाषा व पशुपक्ष्यांची आवाजाची भाषा यांची गणना नैसर्गिक भाषेत होते. संस्कृत भाषेतील 'भाष्' या धातूपासून भाषा हा शब्द आला असून त्याचा अर्थ 'बोलणे' किंवा 'बोलण्याचा व्यवहार करणे' असा आहे. पण केव्हा केव्हा आपल्याला आपले विचार लिहून कळवावे लागतात. अशावेळी आपल्या निरनिराळ्या आवाजाच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुणा ठरवल्या आहेत, त्या खुणांनी आपण आपले लेखन करतो त्याला 'लिपी' असे म्हणतात. यातील प्रत्येक खुणेला 'अक्षर' असे म्हणतात.
आपल्या भाषेचा उपयोग बोलण्याच्या वेळेपुरतात व ऐकू येईल एवढ्या अंतरापुरताच होतो. लिपीचा शोध लागल्यानंतर बोलण्यापेक्षा लिहिण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. बोलणे हे बोलून झाल्यावर नाहीशी होते म्हणून ते क्षर ( = नष्ट होणारे ) पण आपले बोलणे हे लिपीत लिहून ठेवले म्हणजे पुष्कळ काळापर्यंत टिकते. त्याचा कधीच विनाश होत नाही म्हणून त्याला 'अक्षर' असे म्हणतात.
देवनागरी लिपी :
लिपी हा शब्द लिप् म्हणजे लिंपणे, सारवणे, माखणे असा आहे. मराठी भाषा आपण कोऱ्या कागदावर शाईने लिंपतो म्हणून त्याला लिपी म्हणतात. शाईचा शोध लागण्यापूर्वी ताडपत्र, दगड किंवा ताम्रपट यावर करून ठेवत होते. (लिख्=कोरणे) म्हणून अशा प्रकारच्या कोरून खुणा करण्याला लेखन म्हणू लागले. आपण आपल्या मराठी चा भाषेतील जी लिपी वापरतो तिला मराठी बालबोध लिपी असे म्हणतात. हिलाच 'देवनागरी लिपी' असे म्हणतात. ही आर्य लोकांची लिपी. त्यांनीही ती आपल्याबरोबर भारतात आणली. हे लोक येतील मूळच्या द्रविडी लोकांपेक्षा वर्णाने गोरे व तेजस्वी होते. म्हणून त्यांना देव असे म्हटले जात असे. हे आर्य लोक मोठमोठ्या नगरामध्ये राहत असत म्हणून ते नागरी व त्यांच्या लिपीला 'देवनागरी लिपी' असे नाव पडले. अनेक भाषांची लिपी देवनागरी आहे. ज्या लिपीमध्ये येणार प्रत्येक स्वर किंवा ध्वनी स्वतंत्र चिन्हाने किंवा वर्णाने दाखविला जातो व प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी. त्या दृष्टीने पाहता इतर लिपी पेक्षा आपली देवनागरी लिपी पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याचा हेतू इतकाच की, यातील इ व उ हे दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ किंवा लांबट उच्चार दाखवण्याची यात सोय नाही शिवाय च, ज, झ हे वर्ण दोन तऱ्हांनी (च्य, च) उच्चारले जातात. हे किरकोळ दोष सोडून दिले, तर मराठीत बहुतेक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे. या लिपीचा लेखनामध्ये प्रत्यक्ष वापर करताना विविध रेषा म्हणजेच उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलाकार अशा रेषांचा वापर केला जातो. या लिपीमध्ये लिहित असताना डावीकडून उजवीकडे लिहिले जाते. एक ओळ लिहून पूर्ण झाली की पुन्हा त्याच पद्धतीने एकाखाली एक अशा ओळीत आपण लिहित जातो. वर्ण जोडायचे असल्यास ते एका पुढे एक किंवा एका खाली एक अशा दोन्ही प्रकारात जोडतात. या लिपीतील काही अक्षरांच्या वळणात कालांतराने थोडा फरक झालेला आढळतो. ही लिपीमध्ये जलद गतीने लेखन करता यावे म्हणून यातील अक्षरे काही प्रमाणात मोडून किंवा त्यांना थोडी मुरड घालून लिहिण्याची पद्धत काही काळ प्रचारात होती. तिला 'मोडी लिपी' असे म्हणतात.
आपण आपल्या भाषेतील व्यवहार जसा विविध संभाषणातून किंवा एकमेकांना बोलून करतो, तसाच तो लिहूनही करतो. म्हणून कोणत्याही भाषेमध्ये त्या भाषेशी संबंधीत संभाषण, भाषण, लिखित मुद्रा वा लेखन या दोहोंचा समावेश होतो. भाषा अनेक प्रकारच्या आहेत. मराठी, कानडी, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली आधी जशा भारतीय भाषा आहेत, तशाच इंग्रजी, फ्रेंच, जर्मनी, स्पॅनिश, जपानी अशा परकीय भाषा ही आहेत. आपल्याला फक्त मराठी भाषेचाच विचार करायचा आहे.
व्याकरण व त्याची आवश्यकता :
आपण जेव्हा बोलतो किंवा लिहितो. तेव्हा आपले विचार इतरांना जसे कळले पाहिजेत, तसेच इतरांचे आपल्याला कळले पाहिजेत. याकरीता आपली मराठी भाषा एका वेगळ्या व विशिष्ट पद्धतीने बोलली किंवा लिहिली गेली पाहिजे. तरच ती शुद्ध ठरते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते उदाहरणार्थ - ' त्याने ग्रंथ वाचला', ' त्याने पोथी वाचली', ' त्याने पोथ्या वाचल्या', अशा ठराविक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. या ऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने ग्रंथ वाचतो', किंवा 'त्याने पोथ्या वाचली' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर चुकीचे ठरते. मनुष्यप्राणी असो अथवा पशुपक्षी असो यांच्यामध्ये होणारी भाषेची देवाण-घेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांना 'व्याकरण' असे म्हटले जाते. भाषा कशाची बनलेली असते, वाक्याचे घटक कोणते, शब्दांच्या जाती किती, त्यांची कार्ये कोणती, शब्द कसे बनतात, त्यांचा वाक्यात वापर करताना शब्दांच्या रूपात कोणते फेरबदल होतात, वाक्यातील शब्दांचा परस्परांशी कोणता संबंध असतो, वगैरेंचा विचार व्याकरणात केला असतो. 'वि + आ + कृ ( = करण)' या शब्दांपासून व्याकरण हा शब्द बनलेला आहे. याचा शब्दशः अर्थ 'स्पष्टीकरण' असा आहे. आपली भाषा कशी घडते याचे स्पष्टीकरण व्याकरणात केलेली असते. अगोदर भाषा बनते, मग तिचे व्याकरण ठरते. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषेचा मागोवा घेत व्याकरणाला जावे लागते.
भाषेला कोणी नदीची उपमा देतात. भाषेच्या या नदीला योग्य दिशा लाभावी म्हणून व्याकरण त्याला दोन्ही बाजूंनी बांध घालते. भाषेचा प्रवाह हा अखंड चालू असतो. त्याला अडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी योग्य वळण देणे हेच व्याकरणाचे काम. जिवंत भाषा ही सतत बदलत असते. तिच्यामध्ये अनेकविध बदल सतत होत जाणे हेच तिच्या जिवंतपणाचे लक्षण होय. अशावेळी व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते व आपल्या नियमांना थोडी मुरड घालावी लागते. आपणास 'शब्दानुशासन' असे नाव पतंजली ने व्याकरणाला दिलेले दिसते. आपल्या भाषेतील शब्दांच्या शुद्ध रूपांचा विचार म्हणजे तिचे व्याकरण. आपण जे बोलतो, विविध लोकांशी संभाषण करतो किंवा प्रत्येक कागदावर लिहितो ते निटनिटके, व्यवस्थित, आकर्षक व शुद्ध असायला हवे यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे.
आपल्याला मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. कोणत्याही भाषेचा सखोल अभ्यास करायचा म्हणजे ती भाषा ज्या ज्या घटकांपासून बनली आहे. तिचा अभ्यास करायचा. आपण एकमेकांशी बोलताना किंवा संभाषण करताना आपल्या मनातील विविध संपूर्ण विचार विशिष्ट क्रमाने मांडत असतो. या संपूर्ण विचारालाच 'वाक्य' असे म्हणतात. आपली भाषा ही अनेक वाक्यांची बनलेले असते. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. शब्द हा वर्णाचा बनलेला असतो. म्हणून आपण १) विविध वर्ण कसे असतात म्हणजेच वर्णविचार २) त्याच बरोबर शब्दविचार व ३) वाक्यविचार अशा क्रमाने मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करू.
सरावासाठी काही प्रश्न :
१) भाषा कशास म्हणतात? भाषा किती प्रकारच्या आहेत?
२) 'लिपी' कशास म्हणतात? देवनागरी लिपी ची वैशिष्ट्ये कोणती?
३) 'व्याकरण' हा शब्द कसा बनला आहे? त्याचा अर्थ काय आहे?
४) मराठी भाषेचे व्याकरण शिकायचे म्हणजे कोण कोणत्या गोष्टी शिकायच्या?
५) व्याकरण कशासाठी शिकायचे?
संग्रहक
श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
सहशिक्षक
एम्, ए, डी, एड्.