वर्ण विचार - प्रकार, उच्चारस्थाने व जोडाक्षरे
उच्चारस्थाने
मराठी वर्णमालेचा अभ्यास केला तर त्यात आपल्याला अठ्ठेचाळीस वर्ण असल्याचे दिसून येते. या सर्व वर्ण किंवा अक्षरांचा उच्चार कसा आणि कोठून होतो ते सविस्तरपणे पाहू.
१) जीभ २) पडजीभ ३) कोमल तालू म्हणजेच कंठ ४) मूर्धा ५) कठोर तालू (तालू) ६) दंततालू ७) दात ८) ओठ ९) नाक
म : मुखविवर (म्हणजे तोंडाची पोकळी)
न : नासिकाविवर ( म्हणजे नाकाची पोकळी)
अ : अन्ननलिका
श्व : श्वासनलिका
विविध ध्वनी तयार करणारी किंवा निर्माण करणारी पेटी म्हणजेच आपले तोंड आहे. अन्ननलिका आणि श्वासनालिका अशा दोन नलिका आपल्या गळ्यामध्ये असतात. या दोन नलिका एका पातळ पडद्याने एकमेकांना जोडलेल्या असतात. आपण जे अन्न खातो ते अन्न जठरामध्ये पोहचवण्याचे काम अन्ननलिका करते, तर श्वासनालिका हि आपल्या फुफ्फुसांना जोडलेली असते. श्वासनलिकेतून हवा फुफ्फुसामध्ये ये -जा करत असते. आपण नाकावाटे जेव्हा श्वासोच्छ्वास करतो, यावेळी फुफ्फुसांमध्ये साठवलेली हवा बाहेर निघत असताना ती आपल्या कंठनलिकेच्या मार्गाने बाहेर पडत असते. जेव्हा ही हवा बाहेर पडते त्यावेळी आपल्या कंठनलिकेच्या पाठीमागे असणाऱ्या अनेक ध्वनिरज्यूंवर ताण पडतो. यामुळे एखाद्या सतारीच्या तारा छेडल्या प्रमाणे त्याठिकाणी कंप व नाद निर्माण होतो. फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा श्वासनालिकेतून आपल्या पडजिभेपासून ओठांपर्यंत असलेल्या तोंडाच्या मुखविवरातून म्हणजेच या पोकळीमधून ओठावाटे बाहेर पडते. पडजिभेच्या मागील बाजूस थोड्या वरच्या बाजूस असणाऱ्या दोन छिद्रांमधून ही हवा नासिकाविवरातून म्हणजेच नाकाच्या पोकळीतून नाकातून बाहेर पडते. तोंडातील या दोन पोकळीमध्ये किंवा विवरामध्ये एक पडदा आहे. आपण आत घेत असलेला किंवा बाहेर सोडत असलेला श्वास कंठ, ओठ, दात, तालू, मूर्धा या तोंडातील वेगवेगळ्या भागांना जीभ थडकल्यामुळे विविध ध्वनी निर्माण होतात.
आपल्या तोंडाच्या रचनेचा आपण अभ्यास केला तर त्यांमध्ये कंठ, मूर्धा, तालू, दात, ओठ व जीभ असे विविध भाग आहेत. कंठामध्ये निर्माण होणाऱ्या विविध ध्वनींचा संबंध याच पाच भागांशी आहे. आपल्या मुखावाटे विविध ध्वनी बाहेर पडत असताना ज्या भागाचा जास्त करून वापर केला जातो, त्या भागाचे नाव या ध्वनींना दिले जाते. उदा. कंठ = गळा. पडजिभेच्या पुढच्या भागाला जिभेचा मागील भाग वर उचलून स्पर्श करतो, म्हणजेच तो कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यांना कंठातून निघणारे वर्णन म्हणून त्यांना 'कंठ्य' वर्ण असे म्हणतात. जसे - क्, ख्, ग्. घृ वैगेरे. आपल्या जिभेच्या वरच्या बाजूस वरच्या दातांच्या मागील बाजूच्या भागापासून कंठापर्यंत जो घुमटकर भाग आहे त्या भागाला 'तालु' असे म्हणतात. कठोर तालु व कोमल तालु असे या तालुचे दोन भाग पडतात. पड जिभेच्या पुढील कोमल तालुचा जो भाग आहे त्या भागाला 'कंठ' असे म्हणतात. तालूच्या पुढील असणाऱ्या भागाला कठोर तालू किंवा तालू असे म्हणतात. आपल्या कठोर तालू ला जिभेचे पाते लावून ज्या वर्णाचा उच्चार केला जातो त्या वर्णांना 'तालव्य' वर्ण असे म्हणतात. उदा. च्, छ्, ज्, झ वगैरे वर्ण हे तालव्य वर्ण आहेत. यांचा उच्चार च्य, छ्य, ज्य, झ्य असा केला जातो. तालू व कंठ किंवा कठोर तालू व कोमल तालु यांच्या मधल्या भागाला 'मूर्धा' असे म्हणतात. ज्या ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धला जाऊन भिडतो किंवा चिटकतो, अशा वर्णांना 'मूर्धन्य' वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ -द्, ठ्, ड्, ढ् वगैरे मूर्धन्य वर्ण आहेत. दंत म्हणजेच दात. ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस जाऊन टेकते किंवा चिटकते त्यांना 'दंत्य' वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ - त्, थ्, द्, ध् वैगेर वर्ण दन्त्य वर्ण आहेत. ओष्ठ म्हणजेच ओठ. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्णन आपण उच्चारतो त्यांना 'ओष्ठय' वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ - प्, फ्, ब्, भ् वगैरे वर्ण हे ओष्ठय वर्ण आहे. वर्णांच्या उच्चार स्थानांच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते ते आपण थोडक्यात पाहू या.
वर्णांची उच्चारस्थाने :
१) स्वर - अ, आ
व्यंजने - क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्
मुखाचा भाग - कंठ
वर्णाचे नाव - कंठ्य
२) स्वर - इ, ई
व्यंजने - च्, छ्, ज्, झ, ञ्, य्, श्
मुखाचा भाग - तालू
वर्णाचे नाव - तालव्य
३) स्वर - ऋ
व्यंजने - ट्, ठ्, ढ्, ण्, र्, ष्, ळ्
मुखाचा भाग - मूर्धा
वर्णाचे नाव - मूर्धन्य
४) स्वर - लृ
व्यंजने - त्, थ्, द्, ध्, न्, ल़्, स
मुखाचा भाग - दंत
वर्णाचे नाव - दंत्य
५) स्वर - उ, ऊ
व्यंजने - प्, फ्, ब्, भ्, म्
मुखाचा भाग - ओष्ठ
वर्णाचे नाव - ओष्ठय
६) स्वर - ए, ऐ
व्यंजने - ----
मुखाचा भाग - कंठ + तालू
वर्णाचे नाव - कंठतालव्य
७) स्वर - ओ, औ
व्यंजने - ----
मुखाचा भाग - कंठ + ओष्ठ
वर्णाचे नाव - कंठौष्ठय
८) स्वर - ----
व्यंजने - व
मुखाचा भाग - दंत + ओष्ठ
वर्णाचे नाव - दंतौष्ठय
९) स्वर - ----
व्यंजने - च्, छ्, ज्, झ
मुखाचा भाग - दंत + तालू
वर्णाचे नाव - दंततालव्य
आपल्या मराठी मुळाक्षरामधील किंवा वर्णमालेतील वर्णांची नावे, त्याचबरोबर त्याचे उच्चार हे साधारणता एकच असतात. परंतू 'च' वर्गातील च्, छ्, ज्, झ, हे चार वर्ण मात्र यास अपवाद आहेत. कारण यांचा उच्चार हा दन्ततालव्य किंवा तालव्य असा दुहेरी होतो.
तालव्य : या वर्णांना य् लागून होणाऱ्या च्य, छ्य, ज्य, झ्य यांच्या उच्चारासारखा. उदा. चरित्र, छत्री, जन, जग, जय, जामात, जेवण, झेल, निर्झर.
दंततालव्य : ( या वर्णांना 'अ' लागून होणाऱ्या च्, छ्, ज्, झ याच्या उच्चारासारखे)
कठोर तालूचा दातांकडील खरबरीत आणि फुगीर असलेला जो भाग त्याला 'वत्स' म्हणतात. हा भाग तालू व दात यामधील आहे. याठिकाणी उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना 'वत्स्र्य ध्वनी' म्हणतात. त्यांनाच 'दंततालव्य' असे म्हणतात. उदा. चोच, चारा, चाकर, चमचा, चांदोबा, झाड, झरा, जावई, झोप वैगेरे. पुढील शब्दांच्या उच्चारातील फरक पाहा. उच्चार बदलला कि त्यांचा अर्थ सुध्दा बदलतो.
अनुनासिक : काही वर्णांचा उच्चार करत असताना हवेचा प्रवाह थोडया प्रमाणात नाकावाटे आणि थोडया प्रमाणात तोंडावाटे बाहेर पडते, अशा वर्णांना 'अनुनासिक वर्ण' असे म्हणतात. स्पष्ट उच्चार असलेले अनुनासिक वर्ण शीर्ष बिंदूने दाखवतात. अनुस्वाराच्या उच्चाराचे स्थान हे त्यापुढे येणाऱ्या व्यंजनाचे जे स्थान तेच असते. उदा. 'अंगण' या शब्दातील अ या अक्षरावर असलेल्या अनुस्वाराचा उच्चार त्यापुढे येणारे जे 'ग' हे व्यंजन त्याचे स्थान कंठ्य आहेत. म्हणून (ं) चा उच्चार ' ङ्' असा करावयाचा असतो. अनुस्वाराचे उच्चार पुढे लिहून दाखविले आहेत. अंग - अङ्ग, चंचल - चञ्चल, कंठ - कण्ठ, संत - सन्त, कंप - कम्प. अनुस्वाराचा उच्चार त्यापुढील वर्णाच्या वर्गातील पंचम वर्णासारखा होतो. विसर्गाचा उच्चार त्याच्यामागील स्वरामागोमाग ह्- कारयुक्त होतो. 'दु:ख' मधील विसर्गाचा उच्चार त्याच्या मागील स्वर उ + ह् असा होतो. 'छे:' मध्ये ए + ह् सारखा होतो.
कठोर व मृदू स्वर : वर्णांच्या उच्चार स्थानांवरून त्यांचे वर्गीकरण केले जाते तसेच त्यांच्या उच्चारावरून वर्णाचे कठोर व मृदू असे दोन भाग पडतात. सर्व स्वरांचा उच्चार मृदू आहे. 'कठोर वर्ण' म्हणजे ज्या वर्णांचे उच्चारायला कराला कठीण जाते. जे उच्चारायला कोमल किंवा मृदू त्यांना 'मृदू' वर्ण म्हणतात.
कठोर वर्ण : प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने म्हणजेच क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ् आणि श्, ष्, स् ही व्यंजने. यांनाच 'श्वास' किंवा 'अघोष' वर्ण म्हणतात.
मृदू वर्ण : सर्व स्वर व प्रत्येक वर्गातील शेवटची तीन व्यंजने म्हणजे ग्, घ्, ङ, ज्, झ, ञ्, ड्, ढ्, ण्, द्, ध्, न्, ब्, भ्, म् आणि य्, र्, ल्, व्, ह्, ळ्, ही व्यंजने. यांना 'नाद' किंवा 'घोष' वर्ण असेही म्हणतात.
संग्रहक
श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
सहशिक्षक
एम्, ए, डी, एड्.